Tuesday 10 March 2015

नोकऱ्या दीड हजार; अर्ज पाच लाख



पोस्टमनच्या नोकरीसाठी आले अभियंत्यांचे अर्ज 
मुंबई - पोस्टाची सरकारी नोकरी म्हणजे रोजगाराची शाश्‍वत हमी, हे समीकरण राज्यातील तरुणाईने चांगलेच मनावर घेतले आहे. पोस्टमनच्या नोकरीसाठी "बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग‘ केलेल्या तरुणांनीही अर्ज केले आहेत. अवघ्या दीड हजार जागांसाठी राज्यभरातून तब्बल पाच लाख अर्ज आले आहेत. 

पोस्टमन पदासाठी दहावीपर्यंतच शैक्षणिक पात्रता लागते. 18 ते 27 वयोगटातील उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातात. शेवटच्या तारखेपर्यंत अर्जासोबतच्या रकमेचा तपशील दाखल करावयाचा होता. 24 जानेवारीला या पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली होती. महिनाभराच्या प्रक्रियेनंतर पाच लाख अर्ज दाखल झाल्याचे समजते; तर मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदाच्या 725 जागांसाठी दीड लाख अर्ज आले आहेत. मेल गार्डच्या 21 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया होती. एकूण 2 हजार 426 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारी संपली. पोस्टमन आणि मेल गार्ड या दोन्ही पदांसाठी 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये अशी वेतनश्रेणी आहे. भत्त्यापोटी दोन हजार रुपये मिळणार आहेत. 

त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षा

याआधीच्या पोस्टल आणि सॉर्टिंग सहायक या पदांप्रमाणेच या पदांच्या परीक्षाही त्रयस्थ संस्थेमार्फत घेण्यात येणार आहेत. एप्रिलपर्यंत हे उमेदवार नोकरीवर रुजू व्हावेत, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. सध्या टपाल खात्यात 35 टक्के कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

No comments:

Post a Comment